• +02162 (230 485)
  • info@Sspls.com

   Share website link  

पतसंस्थेचे सन्माननीय सर्व सभासद बंधू आणि भगिनी यांस,


सह्कारच्या माध्यमातून आर्थिक विकासाचा शाश्वत विचार घेवून शिवथर व आसपासच्या परिसरातील तरुणांनी एकत्र येऊन १९ नोव्हेंबर,१९९० रोजी शिवशक्ती सहकारी पतसंस्था लि; शिवथर या संस्थेची नोंदणी करून दि. १ फेब्रुवारी,१९९१ रोजी शिवथर येथे एका छोटयाशा जागेत कामकाजाला सुरुवात केली. स्थापनेवेळी संस्थेकडे रु.६०,०००/- भांडवल व ६०० सभासद होते. संस्थेचे मुख्य प्रवर्तक मा. श्री. प्रभाकर साबळे त्याचप्रमाणे प्रवर्तक मंडळामध्ये मा. श्री. हणमंतराव साबळे, श्री. मुगुटराव साबळे, श्री. रामचंद्र साबळे (गुरुजी), श्री. अनिल वाघमळे, श्री. सुदाम जाधव, श्री. अमर साबळे, श्री. राजेंद्र साबळे, श्री. जयवंत साबळे, श्री. विठ्ठलराव जाधव, श्री. शशिकांत साबळे, श्री. रामदास साबळे, श्री. सुहास माने इ. होते. फक्त सभासदांना कर्ज पुरवठा करणे यापुरतेच मर्यादीत काम न करता लोकांची आर्थिक सक्षमता आणि नैतिक मुल्य वाढविणेसाठी प्रयत्नशील राहणे या बाबी संस्थेच्या संचालक मंडळाने कायम लक्षात ठेवून शिवशक्ती पतसंस्थेची वाटचाल ठेवणेत आली आहे. स्थापनेनंतर लवकरच संस्थेच्या कार्याचा विस्तार करण्यासाठी सातारा येथे तत्कालीन खासदार मा. श्री. प्रतापराव भोसले यांचे हस्ते व खासदार मा. श्री.पृथ्वीराज चव्हाण यांचे अध्यक्षते खाली स्वमालकीच्या जागेत शाखा सुरू करण्यात आली. त्यानंतर लोकांचे मागणीनुसार वेगवेगळ्या ठिकाणी शाखा सुरू करून जिल्हा कार्यक्षेत्र व १२ शाखापर्यंत विस्तार करण्यात आला आहे.

संस्थेचे कामकाज बँकिंग निकषानुसार चालू ठेवतानाच १९९८ पासून महिलांचे बचत गट करणे त्यांना मार्गदर्शन देणे, महिला स्वावलंबी होण्यासाठी त्यांचे व्यवसाय उभारणी करून महिला सबलीकरणाचे कामकाज सुरु ठेवलेले आहे. संस्थेत सध्या २०० महिला बचत गट संलग्न आहेत. याकामी संस्थेस तत्कालीन सातारा जिल्ह्याचे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था मा. डॉ. श्री. संजय भोसले यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. बचतीच्या अनेक योजना राबवित असताना सभासदांच्या कौटुंबिक योजना आणि गरजे नुसार ठेव योजना राबविण्यात येत आहेत. त्यानुसार मासिक प्राप्ती योजना, संकल्प ठेव योजना, बोनस ठेव योजना, दामदुप्पट ठेव योजना, रौप्य महोत्सवी संकल्प ठेव, धनवर्धीनी ठेव, दाम-दिडपट ठेव, मुदत ठेव, स्पेशल सेव्हिंग्ज ठेव इ. योजना चालू असून सभासद ग्राह्कामधून त्यास उत्तम प्रतिसाद मिळत आहे. जुलै २०१४ पासून सहकारामध्ये अभिनव अशी “ शिवआधार योजना” सुरु केली आहे. यामध्ये ठेव योजनेबरोबर सभासदास ' कौटुंबिक संरक्षण ' दिले जात आहे. सभासदांना सर्व शाखांमध्ये सर्व प्रकारचे विमे उतरविण्याची सुविधा, पॅनकार्ड काढणे, डी.डी., आर.टी.जी.एस., एन.ई.एफ.टी., लाईटबील भरणा केंद्र आणि SMS इ. सुविधा दिल्या जात आहेत. स्थापनेपासून सभासदांना आर्थिक गरजा भागवणेसाठी सर्व प्रकारची अल्प, मध्यम व दीर्घ मुदत कर्जे दिली जात आहेत. सामाजिक जाणिवेतून प्रेरित होऊन संस्थेने गुजरात मधील भूकंप, आंध्रप्रदेशातील वादळ, महापूर, किल्लारी भूकंप अशा अनेक वेळी धर्मदाय निधीतून सहायता निधीस देणगी दिली आहे. “आर्थिक विकासाला विचारपूर्वक प्रयत्नांची अट असते” या आदरणीय विनोबा भावे यांच्या विचारधनातील अंशाने प्रेरित होऊन संचालक मंडळाने शिवशक्ती पतसंस्थेची वाटचाल ठेवली आहे. सामाजिक जाणिवेतुन कोविड-१९ च्या काळात मोफत अन्न-धान्य किट वाटप, मोफत फुड पॅकेट वाटप तसेच अल्पदरात मास्क आणि सॅनिटायसर वाटप करण्यात आले. सन २०१५ या रोप्यमोहत्सवी वर्षापासुन नविन CBS संगणकीय कार्यप्रणाली (कोअर बॅंकिंग सिस्टीम) चा स्विकार करुन, नव्या उमेद व संकल्प येऊन यशाचे शिखर सर करण्यासाठी सर्व सभासद / ग्राहकांचा सर्व योजनांध्ये जास्तीत जास्त सहभाग वाढविणेचा संचालक मंडळाचा प्रयत्न व मानस आहे.